व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । दुसरी शिवसेना तयार होऊ शकत नाही. गेलेले 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना एकच आहे. शिवसेना म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. शिंदे-मिंधे काही नाही. पण जो मूर्ती चोरतो तो मूर्ती चोरून मंदिर बनवत नाही तर ती मूर्ती विकतो तसेच हे मूर्तीचोर आहेत. यांच्याकडे दुर्लक्ष करा. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो. पण पावसाळ्यानंतर निघून जातो. त्या गांडूळांचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही. असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

पुढचं भविष्य फक्त शिवसेनेचे आहे. आपलं महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधक या सरकारला 3 चाकाची रिक्षा म्हणत होतं, पण आता महाविकास आघाडीच्या गाडीला प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने चौथ चाक लागलं आहे असे संजय राऊत म्हणाले. शिवसेना सोडलेले 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला.