हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अनेक श्रीसेवक मृत्युमुखी पडल्याने राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावं अशी मागणी विरोधकांनी केल्यांनतर मग कोरोना काळातील मृत्युवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारची बाजू घेतली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. राज ठाकरे हे भाजपचे पोपट आहेत, ते जगाचे नेते आहे उद्या ते ट्रम्पवरही बोलतील अशा शब्दात राऊतांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
आज प्रसामाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कोरोना काळातील मृत्यूंची चौकशी करायची असेल तर संपूर्ण देशात चौकशी करा, उत्तरप्रदेशात गंगा नदीत जे हजारो लोक मृत्युमुखी पडलेली दिसली, गुजरातमध्ये स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागण राज ठाकरे यांनी करायला हवी. राज ठाकरे हे जगाचे नेते बनले आहेत. ते ट्रम्पवरही बोलू शकतात. हे सगळे भाजपचे पोपट आहे, भाजपने यांना खरेदी केल आहे असं संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं आहे. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना ‘सत्तेत आल्यास दोन दिवसांत आरक्षण देतो’, असं म्हणाले होते. त्यामुळे न्यायालयात नेमकं काय होतं, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. इतर सर्व विषयातील निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात. मग महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्या मनासारखा का लागत नाही? असा सवालही संजय राऊत यांनी केला.