हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्या वाट्याला गेल्यामुळे तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केल्यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, महाराष्ट्र सरकार ईडी -सीबीआय (ED-CBI) चा वापर करून पाडण्यात आलं. आणि ईडी काय आहे हे मी मनसे प्रमुखांना सांगायला नको असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवरून छेडले असता ते म्हणाले, कोणी कोणाच्या वाट्याला गेलं नाही. आणि त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आणि मुख्यमंत्रीपद का गेलं हे संपूर्ण जगाला माहित आहे. त्यांना माहित नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेच आहे. महाराष्ट्रातील सरकार हे ईडी -सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. त्याच्या जोडीला खोके होते असं ते म्हणाले.
इडी काय आहे हे मी मनसे प्रमुखांना सांगायला नको, त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे असा टोला लगावत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे . तसेच ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुध्दा आमच्या तोफा आणि पक्षाचं काम सुरुच आहे. शिवसेनेनं कधीच हिंदुत्व सोडलं नाही, असंही संजय राऊत स्पष्ट केलं.