हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. गोव्यात काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्या नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस नेमक्या किती जागांवर आपले उमेदवार देणार असा सवाल पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी थेट आकडाच जाहीर केला.
संजय राऊत म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२ जागांवर आपले उमेदवार उभे करेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ७ किंवा ८जागांवर निवडणूक लढेल. गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही हे मी आपल्याला लिहून देतो असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.
गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जप्त होईल असे विधान आशिष शेलार यांनी केलं होत त्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. राऊत म्हणाले , निवडणूक लढणे आमचा अधिकार आहे, भाजपने देखील केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा अनेक राज्यात किती डिपॉझिट वाचवले आणि किती घालवले याचा हिशोब केला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक हारला म्हणजे निवडणूक लढायचीच नाही असे कुठे संविधानात लिहिले नाही असे म्हणत एक दिवस गोव्यात नक्कीच आमची सत्ता येईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला