हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेत्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान आता राऊतांनी पुन्हा ट्विट करीत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “बाप बेटे जेल मधे जाणार ! Wait and watch ! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र !,” असे ट्विट राऊतांनी केले आहे.
काल पत्रकार परिषद घेत राऊतांनी किरीट सोमय्या यांचे पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप यांनी केला होता. घोटाळ्याची सर्व कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. त्यानंतर आज राऊतांनी सूचक असे ट्विट केले आहे.
बाप बेटे जेल मधे जाणार!
Wait and watch!
कोठडीचे sanitization सुरू आहे..
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2022
खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले होते. सन २०१७ साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता माझा मुलगा नील याचे नाव घेतले जात आहे. माझ्या विरुद्ध आणखी तीन खटले दाखल करण्याच्या ते तयारीत आहेत. मला त्यांची स्थिती समजू शकतो. मी आणखी एका प्रकरणाचे, चौकशीचे स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. कोणत्याही भ्रष्टाटारात गुंतलेलो नाही, असे सोमय्या यांनी म्हटले होते.
संजय राऊत यांनी सोमय्यांवर काय आरोप केले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पीएमसी बँक घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान याचे किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंधअसल्याचा आरोप त्यांनी केला. वाधवान हा सोमय्यांचा पार्टनर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राकेश वाधवाने भाजपला २० कोटी रुपयांचा निधी दिला होता असा खळबळजनक आरोप करत या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खासदार राऊत यांनी केली होती.