हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीने काल अटक केली. राऊतांच्या अटकेप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केली. “शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम करतात. शिवसेनेत शिंदे गटातील आमदारांनी जो उठाव केला त्याचा सर्वाधिक आनंद शरद पवारांना झाला असेल. शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊतांचा वापर शरद पवारांनी केला, असे शिरसाट यांनी म्हंटले.
शिंदे गटाचे आ. शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांवर टीका करताना ते म्हणाले की, राऊतांवर जी कारवाई सुरू आहे ती मागील 4-5 महिन्यापासून सुरू आहे. काल ईडीच्या कारवाईवेळी राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही झाली. परंतु अशा अविर्भावात ते वागले नाहीत.
राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून त्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. शिवसेना फोडण्याचं पाप केले, त्या पापाची फळे ते भोगत आहेत. अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होत आहे. राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असल्याचे शिरसाट यांनी म्हंटले.