Satara News : सातारा जिल्ह्यात मास्कसक्ती!! वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Corona Mask News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजात मास्क अनिवार्य करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीडचे रुग्ण आढळू लागले असून सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत 45 जणांना कोवीडची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा मास्क सक्ति करण्यात आली आहे.

राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परिपत्रक काढत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.