सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. बॅंकेच्या 21 संचालकापैकी 11 बिनविरोध निवडूण आल्यानंतर 10 जण निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने चक्क महाविकास आघाडीतील काॅंग्रेस व शिवसेना पक्षांशी पंगा घेतला असून भाजपाशी तह केल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा जिल्हा बॅंकेत सर्वसामावेशक पॅनेल असल्याचे वारंवारं सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात अर्ज माघारी दिवशी राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडूण आले. तर काॅंग्रेस व शिवसेनेला सपशेल विचारात न घेता राष्ट्रवादीने पंगा घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी जिल्ह्यात दिसून येत आहे.
सध्या लागलेल्या निवडणूकीत शिवसेना व काॅंग्रेसच्या एकाही उमेदवारांचा समावेश नाही. उलट कराड सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांनी काॅंग्रेसचे अॅड. उदयसिंह पाटील यांच्या विरोधात तर पाटण मतदार संघात शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी शड्डू ठोकला आहे. अशावेळी कराड दक्षिणेत राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना गळाला लावले आहे. परंतु सध्यातरी डाॅ. अतुल भोसले यांनी स्वतः कोणतीच राजकीय आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेल ऐवजी भाजपा समावेश असा अर्थ आता नाराजांकडून केला जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमध्ये तसेच बिनविरोध आलेल्या उमेदवारात भाजपचे राज्यसभा खासदार छ. उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण- खटावमधून भाजपचेच अनिल देसाई यांचा समावेश आहे.