सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीळ संभाजीनगर येथील निवृत्त माजी सैनिकाच्या घरातून परवानाधारक बाराबोर रायफल व 14 जिवंत काडतुसे चोरी करणाऱ्या दोघा जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका पुरुष व महिलेचा समावेश असून दोघेही आरोपी बहीणभाऊ आहेत.
दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. प्रवीण रामू पवार (वय 19) व त्याची बहीण संगिता विजय राठोड (वय 30, दोघेही मूळ रा. उडगी, ता. मागेवाडी, जि. विजापूर सध्या रा. जाताई. मळाई मंदिराच्या पायथ्याला, चंदनगर, एमआयडीसी, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा येथील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या संजय मुरलीधर जाधव या निवृत्त माजी सैनिक यांनी त्यांच्या घरात एका जोडप्याला भाडेतत्वावर राहण्यासाठी खोल्या दिलेल्या होत्या. दरम्यान निवृत्त सैनिक संजय जाधव हे काही कामासाठी त्याच्या वर्णे या गावी गेले असता त्याचवेळी संबंधित भाडेकरू महिला व तिच्या भाऊने जाधव यांच्या घरात जाऊन त्यांच्याकडे असलेली परवानाधारक रायफल व चौदा राउंडची चोरी केली. याबाबत जाधव यांनी पोलिसात तक्रार केली होती.
जाधव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत संबंधित भाडेकरू महिला व तिच्या भाऊला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून रायफल व चौदा राऊंडही ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
पोलीस अधिक्षक आंचल दलाल, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय सावळे, विक्रम माने, कॉन्स्टेबल संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ गणेश भोग व सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. त्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.