हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आधीच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आज महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि काँग्रेसने निलंबित केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अचानक समोरासमोर आले. मात्र एकमेकांकडे न बघता दोन्ही नेत्यांनी कानाडोळा केला आणि निघूनही गेले.
अहमदनगर जिल्ह्यात माजी मंत्री शकंरराव गडाख यांच्या मुलाच्या विवाह सोहळा होता. या विवाहसोहळ्याला सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली, त्यावेळी हा प्रसंग घडला. दोन्ही उमेदवारांनी वधू – वरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्यजीत तांबे हे लग्न मंडपातून बाहेर पडत असताना अचानक समोरून शुभांगी पाटील यांची एन्ट्री झाली. दोन्ही उमेदवार आमने-सामने आले. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहिले नाही आणि तेथून निघून गेले.
या लग्नात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार शहाजी बापू पाटील आदींसह लोकप्रतीनिधी अनेक दिग्गज नेतेमंडळींनी उपस्थित लावली होती.