नवी दिल्ली । राज्यातील कोरोना संकट अद्याप स्थिर आहे. त्यामुळे दरवर्षी १५ जूनला सुरु होणाऱ्या शाळा यावर्षी संचारबंदीनंतर कधी सुरु करायच्या यावर शासन विचार करत होते. राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी काही दिवसापूर्वी यासंदर्भात एक आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीत राज्यातील शाळा १५ जूनला सुरु होण्याची कोणतीच शक्यता वर्तविण्यात आली नव्हती. मात्र एका मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी एका वृत्तपत्राच्या वेबिनार शाळा न भरवता वर्ग सुरु करण्याबद्दल माहिती दिली होती. आता दूरदर्शनवरून शाळा भरविली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याबाबत शिक्षणमंत्रीनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठविले आहे.
शाळा सुरु केल्या गेल्या तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. सर्वत्र गर्दी टाळणे गरजेचे असताना शाळेत मुलांमध्ये ते करवून घेणे अवघड होते. ऑनलाईन वर्ग सुरु केल्यास गरीब आणि दुर्गम भागातील त्यासाठीची साधने उपलब्ध करणे त्यांच्यासाठी कठीण झाले असते. परिणामी त्यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या वर्षात विद्यार्थ्यांना टीव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जातील असे दिसून येत आहे. यासाठी राज्य सरकारने दूरदर्शनचे १२ तास आणि आकाशवाणीचे २ तास असा वेळ मागितला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे पत्र केंद्राला पाठविले आहे.
“राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाच प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून हा विचार केला असल्याचे शिक्षणमंत्री यांनी म्हण्टले आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता इतक्यात शाळा सुरु करणे धोकादायक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.