हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियन कोरोना लस स्पुतनिक V तयार करणारे शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह यांची गळा हत्या करण्यात आली आहे. गळा दाबून त्यांना थर मारण्यात आलं आहे. कोरोनाविरुद्धच्या गमलेया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये स्पुतनिक व्ही लसीवर काम करणाऱ्या १८ विषाणूशास्त्रज्ञांच्या टीमचा ते भाग होता. आंद्रे बोटीकोव्ह यांच्या हत्येननंतर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत असून याप्रकरणी सध्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (2 मार्च 2023) वैज्ञानिक आंद्रे बोटिकोव्ह रोगोवा स्ट्रीटवरील त्यांच्या घरी होते. यादरम्यान एक व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. त्याने बोटीकोव्हशी पैशावरून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातच आरोपीने बेल्टच्या मदतीने बोटीकोव्ह यांचा गळा आवळला. बोटीकोव्ह यांच्या हत्येनंतर सदर आरोपीने तेथून पोबारा केला. मात्र रशियन यंत्रणांनी अतिशय जलद तपास करून सदर आरोपीला बेड्या ठोकल्या. अलेक्सी झेड असं आरोपीचे नाव असून त्याने आपला गुन्हा कबूल केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, 47 वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह रशियातील नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते. याआधी त्यांनी रशियन स्टेट कलेक्शन ऑफ व्हायरस डी.आय. इव्हानोव्स्की इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये कोरोना विषाणूच्या लसीवर संशोधन केले होते. त्यांना 2021 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्याबद्दल ऑर्डर ऑफ मेरिट फॉर फादरलँड पुरस्काराने सन्मानित केले होते.