10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री ! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य माध्यमिक मंडळ व बालभारती यांच्या मदतीने आगामी वर्षात आवश्यक असणाराच पाठ्यक्रम शिकविला जाणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाला कात्री लागणार आहे. राज्यात एकूण २ कोटी २५ लाख विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्यातील १ कोटी ९० लाख जवळपास २ कोटी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन सरकार करत आहे.

दरम्यान दूरदर्शनच्या एकूण १६ मोफत चॅनेलपैकी कोणती दोन चॅनेल अभ्यासक्रमासाठी द्यायची, कोणत्या वेळात द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण शाळा १५ जूनपासून सुरु होतील असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरु होईल राज्यात इतरत्र शाळा १५ जूनपासून सुरु होतील अशी माहिती देण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यासंदर्भात ऑनलाईन शिक्षणाचे कॅलेंडर तयार केले आहे. या अभ्यासक्रमात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांच्या तुलनेत गणित, विज्ञान आणि विज्ञान शाखा यांच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जाणार आहे.

भारत सरकारच्या दूरदर्शन या वाहिनीवरील १६ चॅनेल मोफत पाहायला मिळतात. पण ज्यांच्याकडे दूरदर्शनचे डिश नाही आहेत. त्यांना इतर डिशच्या माध्यमातून या मोफत चॅनेलचा लाभ घेता येणार आहे. १६ पैकी मोजक्याच चॅनेलवर १ली ते १२वीचा अभ्यासक्रम दाखविला जाणार आहे. दरम्यान या अभ्यासक्रमासाठी १ हजार तासांचे मटेरियल तयार करण्यात आले आहे. अत्यावश्यक विषयानाच प्राधान्य दिले जाणार आहे. जी अभ्यासक्रम शिकवण्याची गरज नाही अशा अभ्यासक्रमातील शंका विचारण्याची सोयही केली जाणार असल्याची माहिती आयटी सेलचे उपसंचालक विकास गरड यांच्याकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.