मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा अवकाश राहिला असून येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. अशातच युतीच्या चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून दोन दोन नेते पुढे केले गेले आहेत. हे नेते युतीच्या जागा वाटपाबाबत चरचा करणार असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे येत्या काही काळात युतीची सकारात्मक अथवा नकारात्मक फलश्रुती समोर येणार आहे.
गणेश उत्सव संपन्न होण्याआधी युतीची बोलणी उरकून घेण्याचा भाजपचा निर्धार असून त्यानंतर प्रचाराच्या कामाला लागण्याचा विचार दोन्ही पक्ष करत असल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत ठरलेला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला बारगळला असून आता भाजप सांगेल तो फॉर्म्युला शिवसेनेला मुकाट्याने ऐकावा लागेल अन्यथा स्वबळाचे धनुष्य ताणावे लागेल अशीच परिस्थिती सध्या राजकीय पटलावर बघायला मिळत आहे.
युतीची बोलणी करण्यासाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आले आहे. तसेच शिवसेनेकडून सुभाष देसाई चर्चा करणार असल्याचे बोलले जाते आहे. आज पासून जागा वाटपाची चर्चा करणार असल्याची माहिती काल सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे वाटाघाटीवर कशी चर्चा होते यावरच निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे.