माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. मोहिते पाटील घरण्यासोबत संबंध सुधारून बबन शिंदे भाजपच्या तिकिटावर मुलाला आमदार करण्याच्या खटपटीत आहेत. अशातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला माढा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी माढ्याची जागा भाजपला सोडण्यास कडाडून विरोध केला आहे.
युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून शिंदे घराण्यातील व्यक्तीला तिकीट मिळू नदेण्याचा इरादा शिवाजी सावंत यांनी जाहीर केला. बबन शिंदे यांचा राजकीय अंत करण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे बबन शिंदे आता भाजपमध्ये गेले तरी आपण त्यांना माढ्याची जागा भाजपाला मिळू देणार नाही असे शिवाजी सावंत यांनी म्हणले आहे. माढ्याची जागा युतीत शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनाच या जागी निवडणूक लढेल असे शिवाजी सावंत यांनी म्हणले आहे. यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे या जागेचा आग्रह धरणार आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान माढ्याची जागा शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मिळू द्यायची नाही. ती भाजपकडे खेचायची यासाठी भाजप नेतृत्व आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच प्रमाणे माढा मतदारसंघाला माळशिरस तालुक्याची काही गावे जोडली असल्याने या गावाच्या जोरावर मोहिते पाटील देखील आपला दावा सांगू शकतात. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर या मतदारसंघात चाचपणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे मोहिते पाटील देखील बबन शिंदेंच्या भाजप प्रवेशाला आडकाठी करू शकतात अशी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे बबन शिंदेंचे राजकीय भवितव्य सध्या तरी अधांतरी असल्याचेच दिसून येते. तसेच त्यांच्यासाठी येणारा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्यावरच त्यांच्या अस्तित्वाची गणिते ठरणार आहेत.