कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कोव्हीडच्या घोटाळ्यावरून आरोप केले जात आहेत. दरम्यान सोमय्यांच्या आरोपांबाबत शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हे दररोज नवनवीन आरोप करत असतात. त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा मंत्री देसाई यांनी दिला आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजप नेते किरीट सोमय्या हे दररोज नवनवीन आरोप करत असतात. त्यांनी पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या वरही कोव्हीड काळात अनेक घोटाळे केले असे आरोप केले आहेत. वास्तविक पाहता सोमय्या यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांना किती महत्व द्यायचं हे माध्यमांनी ठरवावं.”
“सोमय्या यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांविषयी कोठेही तक्रार करावी. मात्र, त्यांना एवढंच सांगणे आहे की, कोव्हीड काळात जे काही सर्व निर्णय झालेले आहेत. ते सर्व निर्णय हे पारदर्शक झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही,” असेही मंत्री देसाई यांनी यावेळी म्हंटले.
सेना आमदारांच्या निधी वितरणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ – देसाई
सेना आमदारांनी निधी वितरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत मला कल्पना नाही. मात्र, निधी वितरणाबाबत सेना आमदारांची काही भुमिका असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निदर्शनास आणून देऊ, असे मंत्री देसाई यांनी म्हंटले.