अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकऱ्यांसह सर्वसामांन्यासाठी विविध प्रश्नावर लढणारा नेता म्हणून शंकरराव यांची ओळख आहे. यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र असलेल्या शंकरराव यांनी १९९५ साली वयाच्या २५ व्या वर्षी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी २०१७ साली क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सोमवारी मोठी रॅली काढत शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांसह गोरगरीब जनतेचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे शंकरराव गडाख यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनातील भूमिकेमुळे शंकरराव यांना काही काळ पोलीस चौकशीलाही सामोरं जावं लागलं होतं. नेवासा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही क्रांतिकारी शेतकरी पक्षाने चांगला जम बसविला आहे. मागील निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये ५ तर पंचायत समितीमध्ये १२ सदस्य निवडून आले असून माजी खासदार यशवंतराव गडाखांच्या प्रतिमेचा फायदा या निवडणुकीतही शंकररावांना होणार का हे पाहून औत्सुक्याचं ठरणार आहे.