हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आहे. तब्बल 14 दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा काही काळ या यात्रेत सहभागी होतील अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
हिंगोली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील एकूण दौऱ्याबाबत माहिती दिली. 7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राहुल गांधींचा एकूण 14 दिवसांचा मुक्काम महाराष्ट्रात असणार आहे.नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून या यात्रेची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात ३८१ किमीचा पायी प्रवास राहुल गांधी करणार आहेत. याशिवाय नांदेड आणि शेगाव येथे त्यांच्या दोन सभा महाराष्ट्रात होणार आहेत.
दरम्यान, भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी सहभागी होणार का असा सवाल केला असता थोरात म्हणाले, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे या यात्रेत सामील होतील तसेच राष्ट्रवादी कडून स्वतः शरद पवार किंवा त्यांचे नेते आपला सहभाग नोंदवतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पायी चालणार नाहीत, मात्र यात्रेत त्यांचा सहभाग निश्चित दिसणार आहे असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.