हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आता या विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणाबद्दल मोदी जे बोलत आहेत ते चुकीच आहे, यापूर्वी महिला आरक्षणासंदर्भात अनेकदा अनेक निर्णय झालेले आहेत” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका करत, त्यांनी या विधेयकाला नाईलाजाने समर्थन केल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी म्हटले की, “संसदेत महिला आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. दोन सदस्य सोडले तर कुणीही याला विरोध केला नाही. एक सूचना होती की, घटनात्मक दुरुस्ती करताना ओबीसींना देखील संधी द्यावी. ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधान यांनी काँग्रेस आणि काही लोकांनी नाईलाजाने पाठिंबा दिल्याचं म्हणणं चुकीचं आहे. यापूर्वी देखील महिला आरक्षणावर चर्चा झालेली आहे. माझ्याकडे संरक्षण खातं होतं तेव्हा पहिल्यांदा ११ टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी चुकीचं बोलू नये”
त्याचबरोबर, “1993 साली महाराष्ट्राचे सूत्र माझ्याकडे होते. त्यावेळी राज्य महिला आयोग आम्ही स्थापन केला. आपलं राज्य हे पहिलं राज्य होतं. शिवाय स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू केला आणि महिलांना आरक्षणाचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं होते. सरकारी, निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत 33 टक्के आरक्षण महिलांना देण्यात आलं. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यात महिला आरक्षण मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु असे असताना देखील दुसऱ्या बाजूला महिला आरक्षण विधेयकावरून भाजपावर टीका केली जात आहे. महिला आरक्षण विधेयक आणण्यामागे भाजपचा वेगळा हेतू असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे.