कर्नाटकचे हल्ले थांबले नाही तर पुढच्या 24 तासांत…; शरद पवारांचा बोम्मईना अल्टीमेटम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून आज कर्नाटकच्या बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “मुख्यमंत्री बोम्मईकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. 48 तासात महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. तर मलाही कर्नाटकमध्ये जावं लागले, असा इशारा पवार यांनी दिला.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकमधील बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. या गाड्या रोखल्या. तसेच बेळगाव आणि इतर मराठी भाषिक परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातंय. यामुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचाही बांध फुटत चालला आहे. देशाला ज्यांनी संविधान दिलं. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे.

फडणवीसांच्या फोनवरील चर्चेचा काहीच उपयोग नाही

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. हे चित्र घडत असताना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीसांनी बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही परिस्थिती चिघळू शकते. येत्या २४ तासात वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर संयमाला रस्ता पहायला मिळेल, या स्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असेल, असा इशारा पवार यांनी दिला.

…तर आम्हीही वेगळी भूमिका घेऊ

उद्या पासून संसदीय अधिवेशन सुरू होत आहे. मी खासदारांना विनंती करणार आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घ्यावी आणि सध्याच्या परिस्थितीची माहिती द्यावी. तरी देखील भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्राने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. परंतु, संयमाला देखील मर्यादा असतात. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर बेळगावला जाणार, असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून केवळ बघ्याची भूमिका

यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारवारही निशाणा साधला. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका घेतली जातेय. सहकाऱ्यांकडून हल्ले घडत आहेत. देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे. हेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सराकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे शरद पवार यांनी म्हंटले.