हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ओरिजीनल शिवसेना आहे असा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही त्यांनी दावा केला असल्याने त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांना सल्ला दिला आहे. “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात,” असे पवारांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांनी आज बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला. पक्षाचं वेगळं चिन्हही घेतले. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह आम्ही मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही.
हळूहळू मित्रपक्षांना संपवायचं हीच भाजपाची रणनिती
यावेळी बिहारमधील राजकीय भूकंपाबाबत पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपाची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली गेली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतु नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असेही पवार यांनी म्हंटले.