हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे,” असे पवार यांनी म्हंटले आहे.
शरद पवार हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यासाठी आज दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे मध्यावधी निवडणुका होतील, असे मी म्हणालोच नाही. मी फक्त तयारीला लागा, असे म्हणालो. आता पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावा लागणार आहे.”
यावेळी पवारांनी बंडखोर आमदारांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “काही तरी कारण द्याव, म्हणून बंडखोर आमदार सांगत आहेत. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी कधी हिंदुत्वाचं तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं कारण दिलं. शिवसेना सोडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण नाही,” असेही पवार यांनी म्हंटले.
राज्यपालांवरही साधला निशाणा
यावेळी पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. त्यांच्याकडे बहुतेक खूप काम असेल. पण दुसरे सरकार आले आणि त्यांनी ही मागणी 48 तासामध्ये मान्य केली. हे असे करणारे आपले पहिलेच राज्यपाल असतील. शिंदे यांचे बंड एका दिवसात झाले नाही. बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे पहिले राज्यपाल. पहिल्यांदाच 48 तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला,” असे पवार म्हणाले.