कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जगभरातच हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या देशभरातील घडामोडींचा आढावा शरद पवारांनी यावेळी घेतला. देशातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत चालला असला तरी प्रशासन सजगतेने काम करत असून येत्या काळात ही परिस्थिती निश्चित नियंत्रणात आणली जाईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित संवादात शरद पवार बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करत शरद पवार यांनी आजच्या फेसबुक लाईव्हची सुरुवात केली. यानंतर कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या दुःखद निधनाबाबत शोक व्यक्त करतानाच शरद पवार यांनी त्यांच्याप्रति भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. या दोघांच्या जाण्याने कला क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावनाही शरद पवारांनी बोलून दाखवली.

केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांशी असलेल्या समन्वयातून या परिस्थितीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली असताना यावेळी काय करता येऊ शकतं यासंदर्भातील सुचनांचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. ६ कोटी ६८ लाख लोकांना धान्याचं वाटप झाल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. राज्यांत विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मदतीची हेल्पलाईन दिली असून 022-22027990, 022-22023039, 9821107565, 8007902145 या नंबरवर फोन करुन आपल्या समस्या सांगण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं.

येत्या काळात बेरोजगारीची समस्या मोठी असणार असून शेती, व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात मूलभूत बदल करावे लागणार असल्याच्या शक्यता शरद पवारांनी बोलून दाखवल्या. शेतकरी हे अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी असणाऱ्या कर्जाचा दर शून्य टक्क्यांवर आणण्याच्या सूचना शरद पवार यांनी यावेळी केल्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोककलावंतांना मदत केली जात असल्याची माहिती शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हमधील संवादात दिली. बँकांना सरकारने योग्य ते आदेश देण्याची गरज असून वैद्यकीय क्षेत्राला आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची विनंतीही केंद्र सरकारला शरद पवार यांनी यावेळी केली.

यावेळी अनेक दर्शकांनी आपले प्रश्न विचारले त्याचीही उत्तरं शरद पवार यांनी दिली. माथाडी कामगारांचा प्रश्न, औद्योगिक क्षेत्र सुरु न झाल्यामुळे अडचणीत आलेले कामगार यांनी यावेळी आपल्या अडचणी बोलून दाखवल्या.