हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस… शरद पवार हे फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील मुत्सद्दी राजकारणी आणि शेतीची जाण असलेले नेते अशी ओळख आहे. शरद पवारांनी आपल्या ५० हुन अधिक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. ते आम्ही तुम्हाला सांगूच, परंतु आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना पवारांचा याबाबतचा सुद्धा एक किस्सा आज आम्ही आपणास सांगणार आहोत.
खरं तर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद हा आत्ता चर्चेत असला तरी गेली ६०- ६५ वर्षांपासून हा मुद्दा खितपत पडला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढा सुरु होता तेव्हा दोन राज्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. बेळगाव, बिदर, कागवाड, धारवाडसहीत संयुक्त महाराष्ट्रसाठी १९८० च्या दरम्यान एस.एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. सीमावादाच्या लढ्यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, यांचाही सहभाग होता. त्यातच कर्नाटक सरकारने सीमाभागात राहणाऱ्या लोकांना कन्नड भाषेची सक्ती आणि शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केल्यानंतर १९८६मध्ये एस. एम. जोशी यांनी तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात जाऊन भर चौकात निषेध नोंदवण्याचे ठरले होते. परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली होती.
पहिल्याच दिवसाच्या आंदोलनाचे नेतृत्व शरद पवारांकडे होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना बेळगावला जायचं कस असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु मुत्सद्दी पवारांनी यासाठी १ आयडियाची कल्पना केली. पवारांनी प्रथम कोल्हापूर गाठले, तेथून एक फियाट गाडी घेतली. त्यावेळी शरद पवारांच्या सोबतीला बाबासाहेब कुपेकर आणि एक चालक होता. मात्र पवारांनी स्वतः चालकाचा वेष परिधान केला आणि चालकाला मागे मालकाच्या जागी बसवलं. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.
कोणाला थांगपत्ता न लागता शरद पवार बेळगावात पोहोचले होते. बेळगावात जमावबंदी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून चौकात जायचं, असं ठरलेलं. त्यांनतर बरोबर ११ वाजता राणी चन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक गोळा झाल्याने पोलिस गोंधळले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शरद पवार, बाबासाहेब कुपेकर, एच.डी. पाटील यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पवारांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर नेलं. त्यावेळी एस. एम. जोशींनी पवारांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून जोशीही हळहळले होते. शरद पवारांनीच हा किस्सा नंतर सांगितला.
आत्ता महाराष्ट्र सीमावाद प्रश्न ऐरणीवर असताना पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास बंदी घातली. त्यानंतर राज्यातील नेत्यांनी गप्प बसत आपला कर्नाटक दौराच पुढं ढकलला. त्यामुळे शरद पवारांच्या या हिमतीला मोठं महत्त्व आहे. पवारांनी एकवेळ पोलिसांचा मार खाल्ला, पण बेळगाव गाठलेच असंच म्हणावं लागेल.