हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग – बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पवारांच्या राजीनामा प्रकरणावर भाष्य केलं आहे.
पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पक्षाच्या प्रमुख पदावरून निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्राच्या राजकारणास विजेचा झटका बसला. जिल्हा, तालुका स्तरातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते राजीनामा मागे घेण्याच्या हट्टावर कायम राहिले. पवारांच्या घरासमोर, कार्यालयासमोर झुंडी जमल्या. याचा अर्थ असा की, पुढारी म्हणजे पक्ष नाही. त्यांचे पर्यटन सुरूच असते. कार्यकर्ता म्हणजेच पक्ष. शिवसेनेच्या बाबतीत तेच दिसले. मिंधे गटाबरोबर आमदार-खासदार गेले, पण निवडणूक आयोगाने पक्ष त्यांना देऊनही त्यांचा तंबू रिकामाच राहिला आहे असं सामनातून म्हंटल आहे.
राष्ट्रवादीचेही तेच घडले आहे. नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी श्री. पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच’, असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला.
पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे श्री. पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. असं सामनातून म्हंटल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे श्री. पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग- बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरडय़ावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळे भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे असं म्हणत सामनातून शिंदे गटावर सुद्धा हल्लाबोल करण्यात आलाय