हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. आतापर्यंत त्यांनी दिलेले आश्वासनं पाळली नाहीत आणि लोकांना अच्छे दिन पाहायला मिळालेच नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शरद पवार आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपने आत्तापर्यंत दिलेल्या आश्वासनांचा पाढाच वाचत केंद्रावर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, 2014 साली भाजपने अच्छे दिनची घोषणा यांनी केली होती. त्याचं पुढं काही झालं नाही. अच्छे दिन कोणालाही पाहायला मिळाले नाहीत. देशातील सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ई प्रणाली सुरु करण्याचे आश्वासनं भाजपने निवडणूकीच्यावेळी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळले नाही. ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा देण्याचं आश्वासन दिल होतं ते आज ही अपूर्ण आहे. देशातील ३० टक्के घरात अजून शौचालय नाही. महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत असं म्हणत पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.
प्रत्येक घरात जल अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. मात्र, त्याचेही काम अपूर्णच आहे. आता ही योजना 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 2022 पर्यंत प्रत्येकाला 24 तास वीज पुरवली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण केलेलं नाही. 44 टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्राची आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की जी आश्वासनं देण्यात आली ती पाळली गेली नाहीत अशा शब्दात शरद पवारांनी केंद्र सरकारने आत्तापर्यंत जनतेला दिलेल्या आश्वासनांचा पाढाच वाचला.