सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा भाजपचा कार्यक्रम; शरद पवारांचा हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष शरद पवार यांनी आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती लावली. दरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आहे. त्यामुळे हि सत्ता मिळवण्यासाठी भाजपवाल्याना झोपही आता येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणे हा त्यांचा कार्यक्रम आहे. ही आघाडी जसजशी पुढे जाईल तसे भाजप मागे जाईल त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचे लक्ष आहे, असे म्हणत पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

शरद पवार यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ज्यांनी ज्यांनी मला जातीवादी म्हणून हिनवले. त्याचा मी आस्वाद घेतला. अशा प्रकारची विधाने करण्यामुळे लोक हसतात.मात्र,अशी विधान लोक गांभीर्याने घेत नाहीत, लोक ऐकतात आणि सोडून देतात.

यावेळी शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण प्रश्नीही आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जाणकार याबाबत योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल याची अंमलबजावणी कधी होईल याच्याकडे आमचं लक्ष राहील.

यावेळी शरद पवारांनी महागाईच्या मुद्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आज देशात महागाई वाढली आहे बेकारी वाढली आहे. या विषयाकडे न पाहता भोग्याचे विषय घेतले जातात. ज्यांना आधार नाही ते अशी लोकांची मन भरकटवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.