हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस खळबळजनक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी कमी शब्दात चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जोरदार टोला लगावला आहे.
शरद पवार म्हणाले, छातीवर दगड ठेवायचा की डोक्यावर दगड ठेवायचा त्याच आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. संपूर्ण सत्ता केंद्रीत करुन ठेवत दोघांनी सरकार चालवायचं ठरवल्याचं दिसतंय. त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे. ते सत्ताधारी आहेत ते काय करतात करु द्या, आम्ही विरोधी पक्षात आहोत, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता नितेश राणेंसारख्या पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देत नाही असं म्हणत पवारांनी राणेंना फटकारलं आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-
पनवेलमधील भाजपच्या प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल.