हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल निवडणूक चर्चेत असून ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. काहीही करून बंगाल चा गड काबीज करायचाच यासाठी भाजप कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणेच लढा देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ममतांच्या मदतीला धावून जाणार आहेत.
शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधली आहे. यामध्ये त्यांचा राष्ट्रवादी पक्ष, झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा सहभाग आहे. हे सारे नेते पश्चिम बंगालमध्ये ममता यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनुसार शरद पवारांनी प्रचारसभांच्या तारखाही निश्चित केल्या आहेत. बंगालची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मानली जात आहे. भाजपा नेहमीप्रमाणे केंद्रीय नेते, राज्यांचे मुख्यमंत्री अशी फौज प्रचारात उतरविणार आहे. याला कडवी टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पवारांना आता भाजपाबरोबरच काँग्रेस-डाव्यांविरोधातही लढावे लागणार आहे.