हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी ३ पक्षांची महाविकास आघाडी असताना त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने चौथा पक्ष सामील होणार का? अशा चर्चा महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत वंचितची दिलजमाई झाल्यानंतर या चर्चाना आणखी जोर चढला. मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज वंचित बाबत केलेल्या विधानाने महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासाठीचे दरवाजे कायमचे बंद तर झाले नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय. वंचित म्हणजे पायात पाय घालणारी बी टीम आहे असा थेट आरोप शरद पवारांनी केलाय.
शरद पवार हे आज जळगावमध्ये आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्रातील एंट्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवारांनी निशाणा मात्र वंचित वर साधला. मागची निवडणूक आठवली तर आम्हाला काही नुकसान सहन करावे लागेल. ते नुकसान वंचितच्या वतीने करण्यात आले. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. कोणालाही कुठही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात अस दिसतय की स्वत: लढायच असत आणि दुसऱ्या एक- दोन टीम पायात पाय घालण्यासाठी तयार करायच्या असतात. याला राजकारणाची बी टीम म्हणतात. ही बी टीम आहे की काय आता कळेल असं शरद पवारांनी म्हंटल.
शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडीवर थेट आरोप केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे कायमचे बंद तर झाले ना अशी शक्यता निर्माण झाली आहे. पवारांच्या या आरोपांवर प्रकाश आंबेडकर नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. तसेच याबाबत ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय असेल हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लवकर होतील की नाही हे सांगता येत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच याबाबत ठरवेल. परंतु गेल्या काही महिन्यात राज्यांचे निकाल ज्याप्रमाणे लागले ते पाहिल्यानंतर कोणताही शहाणा माणूस निवडणुका घेईल असं वाटत नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.