हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन पार पडत आहे. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांची निवड करण्यात येत असल्याचे पवारांनी सांगितले.
दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनास पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी खा. शरद पवार म्हणाले, दिल्लीत जनतेची, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला. जनतेची सेवा करण्याची संधी २४ वर्षे मिळाली. आज शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला दिला जात नाही. भाजपकडुन सत्तेचा गैरवापर केला जात आहे.
मला 24 वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपाला अनेक राज्यांनी दूर केले आहे. आता तुमची जबाबदारी आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
प्रफुल पटेल यांच्यावर ‘या’ चार राज्याची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या प्रफुल पटेल यांच्यावर चार राज्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा आदी राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची जबाबदारी अजितदादांऐवजी सुप्रियाताईंकडे
नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमावेळी अध्यक्ष शरद पवार यांनी खा. सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवाय त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे. तर सुनिल तटकरे – राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, पक्षातील नेते अजितदादा पवार यांच्यावर शरद पवार यांनी कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.