अजित पवारांनी केलेल्या वयाच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, जोपर्यंत माझा कार्यकाळ..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपबरोबर गेल्यापासून ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून शरद पवारांवर टीका करताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून टीका केली होती. यावरूनच आता शरद पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. “माध्यमांशी अजित पवार यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “वयाचा हिशोब काढणं त्यांना योग्य वाटत असेल तर ते बोलू शकतात. माझ्या बाबत विचार करायचा झाला तर मी 1967 मध्ये संसदीय राजकारणात आलो. तेव्हापासून मी एकदाही ब्रेक घेतला नाही. संसद आणि विधानसभेत सातत्याने आहे. या काळात माझ्या सक्रियतेबाबत किंवा माझ्या कामाच्या पद्धतीबाबत माझ्या विरोधकांनीही कधी विषय काढला नाही”

त्याचबरोबर, “वयाचा प्रश्न असेल तर मोरारजी देसाई हे सुद्धा ज्येष्ठ होते. ते काम करत होते. लोकं त्यांच्यासोबत होते. अनेक नेते वय वाढलं तरी सक्रिय होते. त्यामुळे अशा गोष्टी काढणं योग्य नाही. मी त्या खोलात जात नाही” असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, “मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. एकदा जाहीर केल्यानंतर पुन्हा तो मुद्दा काढण्याची गरज नाही. राज्यसभेचे माझे एक-दोनच वर्ष राहिली आहेत. ते अर्धवट सोडू का? ते अर्धवट सोडून कसं थांबू? जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि सहकाऱ्यांना मदत करणं हे माझं काम आहे.” असे मोठे विधान शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.