हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, “माझ्यावर आरोप करताना मोदींनी ब्रिफींग केली गेली नसावी अथवा येणाऱ्या निवडणुकीचा धसका मोदींनी घेतला असावा त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असावं” असा टोला देखील पवारांनी मोदींना लगावला आहे.
शरद पवारांचे प्रत्युत्तर
शरद पवारांनी मोदींना प्रत्युत्तर देत म्हटले की, “माझ्या कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात देश अन्यधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. मी माझ्या काळात कृषी क्षेत्रात अनेक योजना सुरु केल्या. 62 हजार कोटींची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. माझ्याच कार्यकाळात आयात करणारा देश निर्यात करणारा झाला. माझ्या कार्यकाळातील कामाची दखल आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली. पंतप्रधान हे पद ही एक संस्था आहे. त्यामुळे मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे”
त्याचबरोबर, “2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो. 2004 मध्ये राज्यात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मला कटू निर्णय घ्यावा लागला. तो म्हणजे अमेरिकेतून गव्हाची आयात करणं. कारण देशातील स्टॉक चांगले नव्हते. माझ्याकडे फाईल आली. मी सही केली नाही. त्यानंतर दोन दिवसाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मला फोन केला, आणि सांगितले तुम्ही फाईलवर सही नाही केली तर चार आठवड्यानंतर आपण धान्य पुरवठा करू शकत नाही. त्यानंतर मी सही केली. यावरून देशाची धान्य स्थिती काय होती. हे दिसून येतं” अशी माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.
नरेंद्र मोदींचे आरोप
दरम्यान, शिर्डीमधील एका कार्यक्रमात बोलताना, “महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले.आम्ही त्याच कालावधीत साडे 13 लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केले” असा आरोप नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर लावला होता.