शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्षपद सोडले 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसीचे माळवते अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वेळा दोन वर्षांचा कार्यकाळ सांभाळल्यानंतर अखेर बुधवारी आयसीसीचे अध्यक्षपद सोडले आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या अध्यक्षनिवडीपर्यंत उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी असणार आहेत. ते या परिषदेचा कारभार सांभाळतील अशी माहिती देण्यात आली आहे. आयसीसी बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मनु सावनी यांनी शशांक मनोहर यांचे आभार मानले.

‘मी शशांक मनोहर यांचे नेतृत्व आणि त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून खेळासाठी दिलेले योगदान यासाठी त्यांचे आभार मानू इच्छितो. मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो”, अशा शब्दात आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु सावनी यांनी शशांक मनोहर यांचे आभार मानले. २०१६ मध्ये शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष झाले होते. २०१८ मध्ये पुन्हा ते बिनविरोध निवडून आले होते. २००८ ते २०११ या काळात शशांक मनोहर हे बीसीसीआय चे प्रमुख होते.

६२ वर्षीय शशांक मनोहर हे जून महिन्यात पदावरून पायउतार होणार होते. मात्र करोनामुळे आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने मनोहर यांना पुढील दोन महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ऑगस्टपर्यंत मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदी कायम राहणार होते, पण अखेर आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला. ‘‘सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून वार्षिक सर्वसाधारण सभा जून महिन्यात होणे सद्य:स्थितीत अशक्य वाटत आहे. त्यामुळे किमान दोन महिन्यांच्या कालावधीकरिता मनोहर हेच ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदी राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात ‘आयसीसी’ला नवा अध्यक्ष मिळू शकेल,’’ असे ‘आयसीसी’च्या संचालक मंडळाच्या सदस्याने त्यावेळी सांगितले होते. अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला येत्या आठवड्यात आयसीसीकडून मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment