अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शेलार- पटेल ठाम; फडणवीसांची कोंडी?

Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजपने लढवू नये अशा विनंतीचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. यांनतर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. राज ठाकरेंच्या पत्रांचा गांभीर्याने विचार करू असं म्हणत फडणवीसांनी संकेतही दिले मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे मात्र निवडणूक लढवण्यास ठाम असल्याचे समजत आहे. त्यामुळे फडणवीस कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक पार पडली. त्यावेळी ही निवडणूक आपण जिंकू शकतो असा विश्वास शेलार आणि पटेल यांनी फडणवीसांकडे व्यक्त केला आहे. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. त्यामुळे स्वपक्षीयांचे ऐकायचं की राज ठाकरेंचं ऐकून महाराष्ट्राची परंपरा जपायची या कात्रीत फडणवीस सापडले आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे याना पत्र लिहीत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे.