शिवसेना फोडण्यासाठी भाजपकडून ‘ईडी’चा वापर; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. “देशात कायद्याचे राज्य नाही. न्याययंत्रणेवर दबाव आहे व केंद्रीय यंत्रणा गुलाम बनल्या आहेत. मुंबई-महाराष्ट्रातील भाजपाचे किमान 7 मंत्री, 15 आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात आत जातील, पण ‘ईडी’ स्वतःच आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते. शिवसेना फोडण्यासाठी भाजपकडून ‘ईडी’चा वापर केला जात आहे हे सिद्ध झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून अग्रलेखातून करण्यात आली आहे.

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर बुधवारी सायंकाळी राऊत यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. या सुटकेनंतर आज उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत अटक आणि सुटका प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. “सध्याचे केंद्रीय सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे यावर मुंबईतील विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळ्याचा ठपका ठेवून संजय राऊत यांना ‘ईडी’ने केलेली अटक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी बेकायदेशीर ठरवली आहे. आपल्या देशात एका ज्येष्ठ संसद सदस्याला बेकायदेशीरपणे अटक करून १०० दिवस तुरुंगात डांबले जात असेल तर कायद्याचे आणि न्यायाचे राज्य देशात नाही. मानवी अधिकारांचे, स्वातंत्र्याचे हे सरळ हनन आहे.

एखाद्याला ठरवून ‘टार्गेट’ किंवा ‘अटक’ करण्याचे काम ईडी करत आहे. प्रवीण राऊत यांचे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असताना त्यास मनी लॉण्डरिंगचे स्वरूप दिले व संजय राऊत यांना नाहक अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींना ‘ईडी’ने अटक केली नाही, असे अग्रलेखातून म्हंटले आहे.