हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर हि निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेने सामना मुखपत्रातून भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील, विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील, अशा शब्दात शिवसेनेने टीकास्त्र डागले आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने नोटाचा प्रचार करुन रडीचा डाव खेळल्याचा आरोपही मुखपत्रातून करण्यात आला आहे. तसेच मुखपत्रातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ‘मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील
या निवडणुकीत भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. भाजपा आणि मिंधे गटाने एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला.
कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शिवसेना खचेल, हतबल होईल असे ज्यांना वाटत होते त्यांचे डोळे पोट निवडणुकीतील ‘मशाली’च्या विजयी भडक्याने दिपले असल्याची टीकाही यावेळी मुखपत्रातून करण्यात आली आहे.