हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेकडून सामनातून टीका करण्यात आली आहे. “शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल,”, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांनी तेच जोडे स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ आली असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
सामनातून पुढे म्हंटले आहे की, वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत श्री. गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला. त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी “शिवसेना आता काय करणार?” असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर त्यांनी पाय ठेवला. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राच्या माथी मारले. त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले, असे सामनातून म्हंटले आहे.