हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनीही राणावत हिच्या वक्तव्याचे समर्थन केले. याबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा कंगना राणावत व विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवले आहे. भिकेत मिळाले नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशातील शेतकरी दीड वर्षापासून ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचे जोखड आता निघालेले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असते? हे कंगनाला जास्त माहिती आहे का? कंगना रणावत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचे जोखड निघून जाते ते स्वातंत्र्य खरे हे म्हणावे लागेल.
देशात शेतकऱ्यांच्या विरोधात लादण्यात आलेले तीन काळे कायदे रद्द होत आहेत. शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले आहे त्यांनी ते भिकेत मिळवलेले नाही. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या आंदोलनात 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडले. त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीतही या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले आहे.