हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग घटनेशी लखीमपूर येथील घडलेल्या घटनेची तुलना केली होती, ती योग्यच आहे. या घडलेल्या घटनेनंतर जनतेच्या संतापाला वाट मोकळी करुन देणे हे विरोधकांचे काम आहे. देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली असल्याची टीका यावेळी राऊतांनी केली.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला जाणार आहेत, त्यांनाही अडवले जाईल. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिस बजाविली आहे. लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली, असल्याचे म्हणावे लागेल.
उत्तर प्रदेशातील जनतेच्या मनात असलेल्या भावनेबद्दल राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये ज्या काँग्रेसचे अस्तित्व संपले होते. त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात व गांधी यांच्या समर्थनार्थ मशाल मोर्चे काढले जाऊ लागले आहेत. अशा प्रकारचे मोर्चे काढले जात असतील तर ही एकप्रकारची जागरुकता म्हणावी लागे. तेथील लिकांना कळू लागले आहे. त्यामुळे लोक जागी होत आहेत, असं राऊत यांनी यावेळी सांगितले.