हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिंदुत्ववाद या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्येजोरदार टीकास्त्र सुरु झाले आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. कश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे. हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे. तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे.
शिवसेना खासदार राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हंटले आहे की, “भाजपात सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. आज हिंदू खतऱ्यात आला आहे. कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत. नव्वदच्या दशकात कश्मीर खोऱ्यात अगदी अशीच तणावाची स्थिती होती.
शिवसेनेने फक्त आणि फक्त सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, असे काहीजण म्हणत आहेत. त्यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. असे म्हणणाऱ्या जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? आज फक्त हिंदू धोक्यात नसून भारत धोक्यात आहे ! १०० कोटी लसींचे उद्दिष्ट पूर्ण झाले म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशातला सगळय़ात मोठा तिरंगा लालकिल्ल्यावर फडकविला हे योग्यच झाले; पण चिनी, पाकडे, बांगलादेशी ज्या बेदरकारपणे सीमेवर धडका मारीत आहेत ते पाहता तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.