जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघत असताना सरकार मात्र…; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सर्वच स्तरांवर महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल, आणि गॅसचे दर गगनाला भिडले असतानाच भाज्यांच्या दराने देखील उच्चांक गाठला आहे. देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर शंभरी पार गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे. यावरुनच आता शिवसेनेने महागाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधालाय. टोमॅटो तर पेट्रोल पेक्षा पण महाग झालाय. महागाईच्या वणव्यात जनता होरपळून निघत असताना सरकार पक्षाने मात्र तोंडाला कुलूप लावले आहे. असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला.

महागाईने जुन्या सरकारच्या कालखंडातील तमाम विक्रम मोडीत काढून महागाईच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. अनेक भाज्या तर आता सफरचंदापेक्षा अधिक दराने विकल्या जात आहेत. वाटाणा आणि टोमॅटो तर हिवाळ्याच्या हंगामात खूप स्वस्तात विकले जाते. मात्र, आज या दोन्ही वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याचे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून म्हटले आहे.

बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ या व अशा लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आपल्या तमाम घोषणांचा आता विसर पडला आहे. देशातील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच क्षेत्रांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. मात्र, दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या सत्तारूढ पक्षाचा एकही नेता-प्रवक्ता महागाईच्या मुद्दय़ावर आता तोंड उघडायला तयार नाही असे शिवसेनेनं म्हंटल.

हिवाळ्यात 25 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता 100 रुपये किलोवर पोहोचला आहे. अंदमान-निकोबारमध्ये तर टोमॅटो 113 रुपये किलो म्हणजे पेट्रोलपेक्षाही महाग विकला जात आहे. वाटाणाही 150 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे. देशाच्या अनेक भागांत लांबलेल्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे यंदा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. खासकरून दक्षिणेकडील राज्यांतून होणारी टोमॅटोची आवक घटली. त्यामुळे टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली, असे सांगितले जात आहे. ते खरे असेलही, मात्र प्रश्न केवळ टोमॅटोचा नाही, सर्व प्रकारचा भाजीपाला आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर जनतेच्या आवाक्यापलीकडे गेल्याचे शिवसेनेनं म्हटले आहे.

दिवसेंदिवस भरारी घेणारी महागाई आणि भाववाढीच्या हल्ल्यांनी देशातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. महागाईच्या वणव्यात जनता होरपळून निघत असताना सरकार पक्षाने मात्र तोंडाला कुलूप लावले आहे. एरवी महागाईच्या प्रश्नावर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकाशपाताळ एक करणारी मंडळी आज सत्तेच्या सिंहासनाचे सुख उपभोगत आहे. महागाईच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षात सैन्नाटा पसरलेला असला, तरी नजीकच्या काळात हेच मौन महागाईच्या आगडोंबात भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला

Leave a Comment