हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण रंगले आहे. त्यातच आज मनसेने थेट शिवसेना भवना समोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करत शिवसेनेला डिवचले. त्याबाबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही अस म्हणत फटकारले आहे.
मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना मनसेवर निशाणा साधला आहे. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे मध्ये आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे मधील हे वैर आणखी वाढण्याची शक्यता आहे.