Friday, June 2, 2023

तुमच्याकडे २४ तास, मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचा; शिवसेनेचे राणा यांना खुलं आव्हान

अमरावती । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर हनुमान चालीसा वाचू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर यावर शिवसेना कडुन प्रतिक्रिया आली आहे. अमरावती शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांनी यावर प्रतिक्रिया देत आमदार रवी राणावर टीका करत रवी राणा यांना आव्हान दिले.

मातोश्री बंगला शिवसैनिकांचे मंदिर आहे. ते काही भाजपा नेत्याच घर नाही. तुम्ही उद्या हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचून दाखवा. उद्या तुमचा पूर्ण दिवस आहे. उद्या जर तुम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा नाही वाचली तर रविवारी दुपारी १२ वाजता तुमच्या घरा समोर हनुमान चालीसा वाचू असा इशारा शिवसेनेने आमदार रवी राणा यांना दिला आहे. त्यामुळे आता अमरावतीत हनुमान चालीसा वरून पुढे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उद्या हनुमान जयंती दिनी अमरावतीत हनुमान मंदिरात पुन्हा एकदा हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची माहिती स्वतः राणा दाम्पत्यांनी दिली आहे. याशिवाय सर्व मंदिरात हनुमान चालीसाचे पठण व्हावे यासाठी मोफत भोंग्याचे वाटप करणार असल्याचं राणा यांनी सांगितलं. दरम्यान राणा दाम्पत्यांच्या या भूमिकेनंतर अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरुन नुकतेच शांत झालेले वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.