हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना करून सत्ता मिळवली. परंतु अलीकडे काँग्रेस कडून स्वबळाचा नारा देण्यात आले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा स्पष्ट केली. तर दुसरीकडे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी सुद्धा भाजप स्वबळावरच लढेल हे स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत आपली आगामी वाटचाल स्पष्ट केली आहे.
स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे असे सामनातून म्हंटल आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे’ असा टोला सेनेनं पटोलेंना लगावला.
परंतु, संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकडय़ांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये’ असेही शिवसेनेने म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.