हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर तोफ डागली आहे. ईडी’सारख्या संस्था या भाजपची धुणीभांडी करणाऱया घरगडय़ांप्रमाणे सध्या काम करीत आहेत. राजकीय विरोधकांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांना थंड करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा राबविल्या जात आहेत असा आरोप शिवसेनेनं केला. तसेच विधिमंडळात विरोधक गोंधळ घालणार असतील तर याला आदळआपट म्हणावी लागेल असा टोलाही लगावला
‘ईडी’सारख्या संस्था या भाजपची धुणीभांडी करणाऱया घरगडय़ांप्रमाणे सध्या काम करीत आहेत. राजकीय विरोधकांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांना थंड करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा राबविल्या जात आहेत, हे आता उघड झाले आहे. दाऊद इब्राहिम हा देशाचा दुश्मन आहे व त्यास तात्काळ हिंदुस्थानात आणून फासावर लटकवायची जबाबदारी केंद्रातल्या मोदी सरकारची आहे. मोदींचे सरकार दाऊदला अद्याप ताब्यात का घेऊ शकले नाही? असा सवाल शिवसेनेनं केला.
दाऊद कराचीमध्ये ज्या भागात राहतो, त्यावर एखादा सर्जिकल स्ट्राईक करून देशाच्या दुश्मनाला कायमचे खतम करायला काहीच हरकत नाही. म्हणजे ‘ना रहेगी बास ना बजेगी बांसुरी,’ पण ऊठसूट “दाऊद दाऊद” म्हणून जमिनीवर काठय़ा आपटायच्या व देशाला “धोका धोका” असल्याचे बोंबलायचे. हे प्रकार कधी तरी थांबायलाच हवेत. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड पंपनीने केलेली 23 हजार कोटींची बँक लूट दाऊदने घडविलेल्या बॉम्बस्फोटांइतकीच भयंकर आहे. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवादच आहे असे सामनातून म्हंटल.
महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी रामदास यांच्या संबंधांवर वादग्रस्त तितकेच बिनबुडाचे वक्तव्य केल्याने समस्त शिवभक्तांत संतापाचे वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी लोक रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत आहेत. याप्रश्नी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी भाजप घेणार आहे काय ? छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे दिशाभूल करणारे वक्तव्य केले त्याचा साधा निषेधही देवेंद्र फडणवीस यांनी करू नये? खरे तर असे अनेक विषय वादळी आहेत अस म्हणत शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे.