हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी विकोपाला गेलाय. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावं लागलं अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
“दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळय़ा भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?’’ अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?,” असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखामधून उपस्थित करण्यात आलाय.
एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात” असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितले ते आहे काय? एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल.
शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपला सत्तेचा माज आला आहे. पवार यांनी वैयक्तिक टीका केली नाही. शेतकऱ्यांना ज्या प्रकारे चिरडले गेले त्यावरचा हा संताप आहे, पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले.
भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते अशी जळजळीत टीका शिवसेनेने केलीय.