रिकाम्या थाळय़ा वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळय़ाच द्याव्या लागतील ; शिवसेनेचा टोला

0
64
Raut and modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू करत पुढील 15 दिवस संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गरीब वर्गासाठी 5,476 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच शिवभोजन देखील मोफत करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या पॅकेज वरून विरोधकांनी टीका केली असली तरी सामना अग्रलेखातुन भाजपवरच जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या रिकाम्या थाळय़ा वाजवून पोट भरणार नाही भरलेल्या थाळय़ाच द्याव्या लागतील असा जोरदार टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्बंधांची घोषणा करताना माणुसकीला प्राधान्य दिले आहे. लॉकडाउन झाले तर गोरगरीबांच्या चुली विझतील, त्यांनी खायचे काय? हा प्रश्न आहेच. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या गरीब वर्गासाठी 5,476 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, सरकार काळजी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात काय सुरू, काय बंद याची यादी जाहीर झाली आहे. अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक सुरू असेल. उद्योग, व्यापार यांवर निर्बंध नाहीत. मुख्य म्हणजे मागच्याप्रमाणे लॉकडाउनची घोषणा होताच जो जेथे आहे तेथेच अडकून पडला असे श्री. ठाकरे यांच्या घोषणेत नाही. लोकांना विश्वासात घेऊन ’बंदची आखणी केली आहे. असे सामनातून म्हंटल आहे.

मुख्यमंत्र्यांनी बंद पुकारला, पण त्यांनी लोकांसाठी ज्या घोषणा केल्या त्या योग्य आहेत. 7 कोटी लोकांना सरकार एक महिना मोफत गहू-तांदूळ देणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर मोफत दिली जाईल. शेवटी ‘बंद’ काळात रिकाम्या थाळय़ा वाजवून पोट भरणार नाही. भरलेल्या थाळय़ाच द्याव्या लागतील. नाहीतर भुकेचा आगडोंब उसळून वणवा भडकेल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा आगडोंब उसळू नये याचीच फिकीर केली आहे. बारा लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा केले जातील. नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये, 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रुपये देण्याचे सरकारने ठरविले आहे. संचारबंदी काळात त्यांच्या पोराबाळांची आबाळ होऊ नये यासाठीच ही सोय सरकारने केली आहे व हे सर्व माणुसकीला धरून आहे,” असं शिवसेनेने म्हंटल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here