राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही – शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारी विमान वापरण्याच्या मुद्यावरुन सध्या राज्यपाल भगतसिंग कोशारी विरुद्ध ठाकरे सरकार असा नवीन वाद रंगला आहे. मुंबई विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. .राज्यपालांचा हा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला. आज याच विषयावरुन सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आणि भाजपला देखील खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोश्यारी हे अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. विधिमंडळ तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी काम केले. केंद्रात मंत्री झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले तरी ते इतके चर्चेत कधीच आले नव्हते. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत पिंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही व राज्यपालांनी तर शहाण्यासारखे वागावे असे संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत, हा प्रश्नच आहे असा टोला शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे.

तसेच राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू आहे असं म्हणत शिवसेनेने भाजपावरही निशाणा साधला आहे.

भाजप नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार पृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय? असा सवाल सामनातून विचारला आहे.

. फडणवीस म्हणतात, ‘राज्यपालांना विमान दिले नाही हा महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आहे. सरकारने राज्यपालांचा अपमान केला आहे.’ विरोधी पक्षनेत्यांचे हे म्हणणे थोडे अतिरेकी आहे. त्यांनी त्यांच्या घटनात्मक सल्लागारांकडून हा विषय समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू आहे.

राज्यपालांना राजकीय कळसूत्री बाहुल्याप्रमाणे पुणी नाचवणार असेल तर तो घटनेचाही अपमान आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ विचारक, प्रचारक असण्याशी महाराष्ट्राला देणेघेणे नाही. अर्थात ते त्या विचारांचे असल्यानेच त्यांना हेरून महाराष्ट्राच्या राजभवनात पाठवले आहे. महाराष्ट्र त्या विचारांचाही आदर करतो. पण भाजपच्या सत्तेचा डाव मोडला म्हणून महाराष्ट्रातील आघाडी सरकारला संधी मिळेल तेव्हा आडवे जाणे घटनेच्या कोणत्या कलमात बसते? महाराष्ट्र सरकारने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई केली की, त्या गुन्हेगाराच्या बाजूने भाजपने काव काव करायची व लगेच राजपालांनी त्या व्यक्तीस सन्माननीय अतिथी म्हणून चहापानास बोलवायचे हे कोणत्या घटनात्मक संस्कृतीत बसते? हे एकदा नाही तर वारंवार घडूनही राज्य सरकारने दुर्लक्ष करावे याचेच आश्चर्य वाटते.

राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही. हे संकेत महाराष्ट्रात पायदळी तुडवले जाणे हाच काळा दिवस मानायला हवा. काळा दिवस पाळून निषेध करावा अशा अनेक घटना महाराष्ट्रात व देशात घडल्या असताना महाराष्ट्रातील भाजप चूप बसला. बेळगावातील मराठी माणसावरील अत्याचारावर काळा दिवस पाळावा असे या मंडळींना वाटले नाही. भाजपास प्रिय असलेल्या नटीने मुंबईचा अपमान केला तरी हे गप्प. त्या अर्णब गोस्वामीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढले तरी हे त्या देशद्रोह्याच्या बाजूने उभे राहिले. भाजपच्या अधःपतनाचा शेवटचा अंक अशा पद्धतीने सुरू झाला आहे व त्या नाट्यात त्यांनी राज्यपालांना खलनायकाची भूमिका दिली आहे. तसे नसते तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या 12 नामनियुक्त सदस्यांची यादी नऊ महिने झाले तरी स्वतःच्या कासोट्यात खोचून राज्यपाल फिरले नसते. 12 सदस्यांची विधान परिषदेत नियुक्ती करणे हा सरकारचा अधिकार आहे. या सदस्यांची नियुक्ती सहा वर्षांसाठी असते. त्यातले नऊ महिने राज्यपालांनी भाजपच्या इच्छेने गिळले. हे सदस्य त्यांच्या नियत वेळेनुसार निवृत्त होतील. पण त्यांच्या नियुक्तीची ‘वेळ’ राज्यपाल ठरवणार. हा घटनेचा भंग आहे. राज्यपालांनी हे असे वागणे कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आहे. अस म्हणत शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment