निधीवाटपावरून शिवसेना आमदाराची काँग्रेस- राष्ट्रवादीवर आगपाखड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असलं तरी निधी वाटपावरून सरकारमध्ये सुरू असलेली धुसपूस अजूनही कायम आहे. त्याचाच भाग म्हणजे निधी वाटपावरून शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी दोन्ही काँग्रेस वर आगपाखड केली आहे. शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक मिळत असून हे खपवून घेणार नाही असा इशारा तानाजी सावंत यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला दिला आहे.

शिवसेनेला महविकास आघाडीत दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पात ते सिद्ध झालं आहे. ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाते. ३० टक्के बजेट हे काँग्रेसला दिले जाते आणि १६ टक्के बजेट हे शिवसेनेला दिले जातेय. त्यातही उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आमचे असल्यामुळे पगारावरच ६ टक्के निधी खर्च होतोय. आणि विकासासाठी फक्त १० टक्के निधी दिला जातोय. असा आरोप तानाजी सावंत यांनी केला.

ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली. तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादी लागू नाका. तुम्ही शंभर मारले तर आमचा एकच दणकट बसलं की तुम्हाला आईचं दूध आठवेल. आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही बघू नका, असं तानाजी सावंत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्यही हसन मुश्रीफ यांच्याकडून कोट्यवधींची कामे मार्गी लावतो आणि आमच्या छाताडा वर बसतो. आमच्या मुळे दोन्ही काँग्रेस सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच घडी विस्कटायची तुम्ही प्रयत्न करताय हे आम्ही खपवून घेणार नाही आम्ही फक्त आदेशाची वाट बघतोय असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला